Friday, May 11, 2012

श्लोक आठवा



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मागील श्लोकापासून स्वामी 'काय करावे ?' ते सांगताहेत. या आठव्या श्लोकातही स्वामी तेच सांगतात. श्लोक आठवा असा आहे :

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ।
मना सज्जना हेची क्रिया धरावी ।।
मना चंदनाचे परी तवा झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ।।

(तिसर्या ओळीत 'तवा' हा शब्द 'त' ला 'वा' जोडून आहे या ब्लोग च्या छपाइत मला हे लिहिणे जमले नाही, क्षमस्व, त्यास पर्याय म्हणून तुवा हा शब्द लिहावासा वाटला पण धजले नाही)

तर 'काय केले' म्हणजे आपसुक षड्रिपुंची बाधा होणार नाही आणि त्याच बरोबर देह सत्कारणी लागेल हे या श्लोकात अत्यंत आदर्श पद्धतीने वर्णिले आहे. पहिल्याच ओळीत सगळ्याचे सार सामावले आहे. हे मना तू सतत असे काही करीत राहा कि जेणेकरून तुझ्या पश्चात तुझी कीर्ती उरेल. काय केल्याने हे होईल? अर्थात चांगले काम केल्याने! तेव्हा तू नेहमी चांगले काम करीत राहा. सामान्यपणे आपण चांगलेच कार्य करीत असतो पण ते जर लोककल्याणार्थ असेल तर त्याने करणार्याची कीर्ती होते. तर असे कार्य तू करीत राहा.

पुढच्या चरणात स्वामी याचे अजून सविस्तर स्वरूप सांगतात. लोककल्याणार्थ काम करणे म्हणजे दाम खर्चून प्रतिष्ठेसाठी काम करवून घेणे नाही तर ते निस्वार्थपणे नेटाने करणे. या दोन अत्यंत विरुद्ध गोष्टी आहेत. आपला पैसा खर्चून काम करवून घेण्याने आपला अहं वाढतो तर ते स्वत: नेटाने निस्वार्थपणे करण्याने अहम कमी होण्यास मदत होते. हे समजावून सांगताना स्वामी चंदनाची सुगंधी उपमा देतात. जसे चंदन स्वत: झिजते व लोकांस सुगंध देते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे तसे करताना त्या चंदनाला त्याच्या मोठेपणाचा, निस्वार्थीपणाचा  स्पर्शही नसतो. म्हणजे लोककल्याणार्थ तू झिजत राहा पण त्याचा अहम तुला बाधणार नाही याची दक्षता तू घे. 

असे केल्याने अशा कामाचे फलस्वरूप म्हणून तुझी कीर्ती उरेल. कीर्ती हे कामाचे फळ आहे उद्देश नाही हे अधोरेखित करावे लागेल. असे काम करण्याची सूचना समर्थ आपणास करीत आहेत.

आता कुणी लोककल्याणार्थ झिजत राहिला तर त्याने काय होईल? तो अहंकाराच्या अग्नी पासून लांब राहील पर्यायाने तो शांत होईल. स्वाभाविकपणे एखाद्या शीतल वस्तू जवळ दुसरी वस्तू ठेवली तर भावाकर्शनाने ती देखील शीतल होईल. तद्वत सतत निस्वार्थ पणे कार्यरत असेलेल्या निगर्वी मनुष्या जवळ असलेली माणसे देखील निवविली जातील आणि यात खरे काय ते लोककल्याण घडेल. हे मना, असे कार्य तू कर असे केल्याने तुझेही कल्याण होईल असे समर्थ आपल्याला सांगताहेत.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।