Sunday, September 18, 2011

श्लोक ७

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पाचव्या आणि सहाव्या श्लोकात अनुक्रमे पाप संकल्प व त्याचे परिणाम सांगितल्या नंतर श्री सदगुरू समर्थ रामदास स्वामी याउप्पर काय करावे ते यापुढील श्लोकांत सांगतात. वरील श्लोकात केलेल्या अभ्यासा नंतर स्वाभाविकपणे वाचकाच्या मनात एक अस्वस्थता जागृत होते. अशा अस्वस्थ परंतु जिज्ञासू मनाला स्वस्थ करण्यासाठी पुढील श्लोकांत उपदेश केलेला आहे.

श्लोक ७ वा : श्रीराम समर्थ श्रीराम

मना श्रेष्ट धारिष्ट जीवी धरावे |
मना बोलणे नीच सोशीत जावे ||
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे नीववावे || श्रीराम ||

अस्वस्थ मनाला स्थैर्य देण्यासाठी समर्थ पहिल्याच ओळीत त्याला धैर्याचा उपदेश करतात. परिस्थिती बिकट असली कि मन त्याचे स्थैर्य सोडू पाहते. अशा वेळी श्रेष्ट असलेल्या धैर्याची कास मनाने धरली पाहिजे. हे धैर्य (धारिष्ट) श्रेष्ठ का आहे? कारण त्याच्या कडे डळमळीत झालेल्या मनाला पुन्हा आश्वस्त करून उभे करण्याचे सामर्थ्य आहे. तर हे मना तू सर्व प्रथम धीर धर.

अनेक दोषांचे उगमस्थान असलेल्या वाचा व बुद्धी यांना शमवण्याचे पर्याय समर्थ पुढे सांगतात. हे मना तू नेहमी सहनशील राहा. इतरांच्या कटू शब्दांचा तू धीराने, शांतपणाने आणि सोशिकतेने स्वीकार कर. कटू शब्दांचा तू असा स्वीकार केल्याने तुझ्या स्थैर्याचा भंग होणार नाही.

तसेच पुढीलांना बोलताना तू स्वत: नेहमी नम्र भाषेचा वापर कर. 

असे का? अशाने काय होईल? तर कटू शब्द धीराने ऐकून घेतल्याने तसेच आपण नम्र भाषेत बोलण्याने क्रोध, मद, मोह व मत्सर या दोषांचे दमन होईल व त्यांच्या परिणामा पासून आपण अलिप्त राहू शकू.

अशा प्रकारे अलिप्त झालेले मन आपल्या वाणीने इतरांना सुद्धा शांत करू शकते तथापि आपण सर्वांना निवविण्याचा (शांत करण्याचा) प्रयत्न करावा.

आपल्या अशा वर्तनाने आपला विवेक (चांगले वाईट ठरविण्याची व चांगल्याच्या स्वीकाराचा आग्रह धरणारी बौद्धिक क्षमता) जागृत होण्यास, बळकट होण्यास सुरुवात होते.

व्यवहारामध्ये या सोशिकतेचा आणि नम्र भाषेचा अत्यंत उपयोग होतो. हा स्वानुभव आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Thursday, September 15, 2011

श्लोक ६

|| जय जय रघुवीर समर्थ || 

मागील श्लोकात पाप संकल्पाचे परिणाम आपण पहिले. त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकृतींचा प्रादुर्भाव पहिला. आज या सहाव्या श्लोकात या विकारांचे स्वरूप वर्णन पहावयास मिळेल.

श्लोक ६ वा : श्रीराम समर्थ श्रीराम

नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम ना ना विकारी ||
नको रे मना लोभ हा अंगिकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भरू || श्रीराम ||

सत्याचा संकल्प सुटला कि त्याची जागा पाप संकल्प घेणार. म्हणजेच आपण व्यवहार्य असे निसर्ग नियम मोडले कि त्यातून विकार हे उद्भवणार. हे विकार जरी कायिक - म्हणजे शारीरिक व्याधी असोत, वाचिक - म्हणजे आपल्या बोलण्यातील अशुद्धी, अपशब्द किवा छाद्मिपणा असोत, मानसिक - म्हणजे मनात येणारे वाईट  विचार असोत किंवा सांसर्गिक - म्हणजे एकमेकांच्या सहवासाने पसरणारे असोत, यांचा उगम होतो तो मनात. मनात उत्पन्न होणाऱ्या या विकारांचे सामान्य पणे वर्गीकरण केले जाते ते ६ दोषात.

हे सहा दोष म्हणजे : काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. हे सहाही दोष माणसाचे शत्रू आहेत, त्यांच्या मुळे माणसाचे अध:पतन होते म्हणून त्यांना 'षड्रिपू' (सहा रिपू, रिपू म्हणजे शत्रू) असे म्हटले आहे. या सहा दोषांना उद्देशून त्यातील काही दोषांचे संदर्भ या श्लोकात घेतले आहेत.

पहिल्या ओळीत मनास म्हटलेय कि हे मना तू खेदकारी अशा क्रोधाला थारा देऊ नकोस. असे आहे, क्रोधाची उत्पत्ती भयातून / भीतीतून होते. ज्या ठिकाणी सत्य व सामर्थ्य नाही तिथे भय निर्माण होते व सामर्थ्या अभावी त्याचे रुपांतर क्रोधात होते. क्रोध हा मनाला आंधळा बनवतो व अशा आंधळ्या मना कडून चूक घडते. सरते शेवटी या सर्व प्रक्रियेतून माणसाला खेद / खिन्नता प्राप्त होते. म्हणून मनाला हि विनंती आहे कि कुठल्याही परिस्थितीत तुझ्या ठायी क्रोधाला जागा देऊ नकोस.

दुसऱ्या ओळीत काम दोषाचे वर्णन येते. काम म्हणजे आसक्ती असणे. मग ती कुठल्याही बाबतीत असो. साधी गोष्ट, भूक लागली कि खावेसे वाटते असे हे कामाचे अगदी मूळ स्वरूप आहे. सामान्यपणे शरीर सुखाची आसक्ती हे कामाचे प्रमुख लक्षण मानले जाते. काम हा असा दोष आहे कि याच्या पाई माणूस इतर अनेक दोषांचा धनी बनतो. त्यामुळे हे मना या नाना विकारी कामाला तू लांब ठेव.

आता कामाचे स्वरूप - कुठल्याही गोष्टीची आसक्ती - पाहिल्यावर त्याच्या मुळे उत्पन्न होणाऱ्या इतर दोषांचा प्रादुर्भाव लक्षात घेणे प्राप्तच आहे. मघाचेच उदाहरण पाहू. भूक लागली कि खावेसे वाटते हा काम. पण म्हणून दररोज भूक लागली कि माणूस भाजी पोळीच खातो का? तसे पहिले तर भाजी पोळी खाऊन त्याचे पोट भरणारच असते पण त्याला 'पुरणपोळी' खावीशी वाटते! भाजी पोळी वरून पुरणपोळीवर नेणारा तो लोभ. उदाहरणावरून कळते कि काम नसला तर लोभ असणार नाही म्हणजेच काम हा इतर दोषांना आमंत्रण देणारा   दोष होय. गम्मत म्हणजे कामाने लोभाला पाचारण करून तो मोकळा झाला. आता लोभाचे दुष्परिणाम पहा. जिथे भाजी पोळी खाऊन पोट सुखी होणार होते तिथे ते पुरणपोळी खाऊन बिघडणार! तात्पर्य जो लोभाला जवळ करतो त्याला 'अति तेथे माती'चे दुष्परिणाम भोगणे प्राप्त आहेच. तेव्हा हे मना तू अशा लोभाचा कधीही स्वीकार / अंगीकार करू नकोस.

आता मूळ श्लोकात नसले तरी मधल्या दोन दोषांचाही - मद, मोह- विचार आपण करू. 

लोभाचे पर्यवसान 'अति' मध्ये होते. ज्या गोष्टीचा माणूस लोभ करतो ती गोष्ट त्याच्याकडे अतिप्रमाणात आढळते. आणि अशा अतिरेकाचा परिणाम उन्मत्ततेत होतो. मला भाजी पोळीची भूक असली म्हणून काय झाले मी तर हवी तेव्हा पुरणपोळीही खाऊ शकतो. या दोषाचे स्थान अत्यंत घातक असे आहे. ज्या प्रमाणे एखादा मदोन्मत्त हत्ती जेव्हा मोकाट सुटतो तेव्हा तो अपार विध्वंस करतो तसेच त्याला कोणीही अडवू शकत नाही त्याप्रमाणे उन्मत्त / मदाने व्याप्त असलेल्या माणसास त्याच्या विध्वन्सापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही. अनेकदा तर अशा माणसांचा अंतही होतो त्यांच्या मदा मुळेच. भस्मासुराच सुंदर उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे.

आपल्या ठायी निर्माण झालेल्या मदा मुळे माणसात उन्मत्तपणा, गर्व किंवा अहंभाव वृद्धिंगत होतो. माणूस स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागतो. जेव्हा त्याला अशीच आणखी माणसे दिसतात तेव्हा स्पर्धा सुरु होते. मग दुसऱ्यापेक्षा जास्त मला कसे मिळेल याची विवंचना सुरु होते हा मोह. भाजी पोळीच्या भुकेसाठी माझ्याकडे हवी तेव्हा पुरणपोळी मिळते, ती मी कितीही खाऊ शकतो पण जेव्हा दुसरा कोणी पंच पक्वान्न खात असेल तेव्हा मला तेच किवा त्याहीपेक्षा चांगले कसे मिळू शकेल हा विचार म्हणजे मोह. सामान्यपणे आज जी भौतिक प्रगतीची स्पर्धा दिसून येते तो मोहचाच वाढता परिणाम होय. अर्थात वाढत्या मोहाने आजचे जीवनमान कसे ढासळलेले आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.

पुन्हा मूळ श्लोकाकडे येताना अखेरची ओळ ज्यात अखेरचा दोष चर्चिला आहे त्याकडे वळू. पाचव्या दोषात निर्माण होणारी चढाओढ परस्परात इर्षा निर्माण करते. कधी प्रसंगी मोहापोटी हवी असलेली वस्तू नाही मिळू शकली तर मनात रोष निर्माण होतो. ज्याच्याशी स्पर्धा आहे, ज्याच्याकडे ती वस्तू आहे त्याच्या बद्दल मनात कटू भाव निर्माण होतात, तो मत्सर. मी पुष्कळ प्रयत्न करून देखील मला जेवावयास पंच पक्वान्न मिळाले नाहीत आणि दुसरा कुणी खुशाल पणे ते खातो आहे तर मला ते खुपेल, मला माझी पुरणपोळी देखील गोड लागणार नाही. तसेच अशावेळी अवमानित झालेली मनस्थिती अपमान सहन करू शकत नसल्याने अपमान लपविण्यासाठी ढोंग करू लागते. मी म्हणतो माझी पोळी त्या पंच पाक्वन्नापेक्षाही सरस आहे वगैरे. वास्तविक पाहता ती मला आता भाजी पोळी इतकीही चांगली वाटत नाही. तात्पर्य मत्सरापोटी मी दंभ करू लागतो. तेव्हा हे मना अशा दंभ कारक मात्सारालाही तू लांब ठेव.

रात्रंदिवस मनुष्य षड्रीपुंना सामोरे जात असतो. या दोषांचा त्याग करणे देह असेपर्यंत अत्यंत कठीण आहे. परंतु श्री समर्थांच्या सुचणे प्रमाणे आपण आपल्या मनास या दोषांपासून निरंतर परावृत्त करीत राहिलो तर आपण पुष्कळ मोठ्या संकटांपासून लांब राहू हे खरे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Friday, September 9, 2011

श्लोक पाचवा

जय जय रघुवीर समर्थ !

आता ब्लॉगर नव्या रुपात येऊ घातलाय आणि बऱ्याच प्रतीक्षे नंतर देवनागरीत लिहिणे शक्य झालेय. म्हणून मायबोलीत लिहितोय.

चला तर, आज श्लोक पाचवा पाहूया.

श्रीराम समर्थ श्रीराम | श्लोक पाचवा

मना पाप संकल्प सोडोनी द्यावा |
मना सत्य संकल्प जीवी धरावा ||
मना कल्पना ते नको विषयाची |
विकारे घडे हो जनी सर्व ची ची || श्रीराम ||

समर्थांनी अत्यंत मुलभूत गोष्टींना धरून इथे मनाला नम्र सूचना केली आहे. ते मनाला सुचवतात कि तु पाप संकल्प सोडावास आणि सत्य संकल्प जतन कारावास.

आता पाप हे असत्याचे प्रतिक आहे. जे सत्य नाही ते असत्य. जगात पंच महाभौतिक स्वरूपाचे जे निसर्ग नियम  आहेत त्या अन्वये जे काही प्राप्त आहे ते सत्य. या नियमांना छेद देऊन जे काही करण्याची इच्छा होते ते असत्य, तोच पाप संकल्प. आपला सनातन धर्म दुसरे तिसरे काही नसून या निसर्ग नियमाची म्हणजेच सत्याची नियमावली होय. 

सत्याचे विस्मरण म्हणजे माया. या माये मुळेच माणूस असत्याचा स्वीकार करतो. म्हणून दुसऱ्या ओळीत स्वामी म्हणतात हे मना, सत्याचा विचार, सत्याचे स्मरण म्हणजेच सत्याचा संकल्प सदैव जतन करून ठेव.

आता हे पाप आणि सत्य संकल्पाचे पथ्य नाही पाळले तर काय होईल? हे पुढल्या दोन ओळीत सांगितलेय. 'मना कल्पना ते नको विषयाची' याचा अर्थ हे मना तु सनातन सत्याला सोडून मायामय अशा इतर विषयांची, जे असत्य आहेत, इच्छा बाळगू नकोस. कारण असत्याच्या सेवनाने निसर्ग नियम मोडतील आणि त्याने कायिक, वाचिक, मानसिक व सांसर्गिक विकार (विकृती) निर्माण होतील.

जगरहाटी 'जगी वंद्य ते' मानणारी असल्याने त्यात तुझ्या ठाई निर्मिलेल्या विकृतींचा स्वीकार होणार नाही उलट तुझ्यावर छी थू  होईल. तु अस्वीकार्य अवमानित होशील. तेव्हा बापा, संकल्पांचे पथ्य पाळ आणि आपले भले करून घे.

नेहमी चांगले (सत्य) कर, वाईट (असत्य) करू नकोस त्याचे वाईटच परिणाम भोगावे लागतील हि 'आधी धरावा आचार, मग पाहावा विचार' यासाठी लागणारी मुलभूत सूचना समर्थ आपणास करून खऱ्या अर्थाने व्यवहार जागृती करतात.

जय जय रघुवीर समर्थ !